जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काही ।
तरी भोग तो रोग होईल देहीं ।
विपत्ती पुढें ते न ये बोलतां रे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ ४ ॥
सरल अर्थ – अतिदुर्लभ असा नरदेह पूर्वसुकृताने मिळाला म्हणून त्याचे लाड-कोड पुरवण्यात, श्रीसमर्थांच्याच शब्दात “अत्यादरे पिंडपोषण” करण्यात आयुष्याचा सर्वाधिक काळ खर्च करावा का? माणूस आस्तिक असो वा नास्तिक, बुद्धिवादी असो वा समाजवादी सगळेच मनापासून या देहाचे, त्याबरोबर देहबुद्धिचे भरण-पोषण करण्यात गुंतलेले असतात. त्याच्या अतिरेकाने आपले शरिर रोगाचे भक्ष्य कधी बनते ते कळतही नाही. तेव्हा आधीपासूनच विवेकाने हरे राम या सोप्या मंत्राचा जप सुरू करावा हेच खरे.
श्रीसमर्थांचा बोध – या आधीच्या श्लोकातून श्रीसमर्थांनी स्पष्टच सांगितले आहे की, पूर्वपुण्याई फळाला आली आणि हा नरदेह लाभला आहे. अध्यात्मदृष्ट्या नरदेह हे ईश्वरप्राप्ती साठीचे एक साधन आहे. जन्माला येण्यापूर्वी जीव देवाला ‘सोऽहं’ म्हणत परमेश्वराकडे कळवळून प्रार्थना करतो, “येथील यातनातून सोडव रे देवा ! मी तुला कधीही विसरणार नाही.” मात्र गर्भातून बाहेर येताच ‘कोऽहं’ म्हणू लागतो. देहालाच ‘मी’ मानून त्याचे लाड करू लागतो. जसे प्रवास करताना गाडी हे प्रवासाचे साधन आहे. प्रवास सुखकर व्हावा म्हणून गाडीची काळजी घेणे, जसे इंधन भरणे; योग्य ती देखभाल करणे जरुरीचे असते. गंतव्य स्थानी पोहोचल्यावर गाडीचे महत्व संपते. त्याचप्रमाणे देहाचा उपयोग ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी आहे पण हा मुख्य उद्देश विसरून माणूस देहाचे चोचले पुरवण्यात गुंतून पडतो. अतिभोगाने देहबुद्धी बळावते, देह रोगाचे कोठार बनते. वेळेवारी भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केले तर इंद्रियांचे विषयांवर असलेले प्रेम हळूहळू भगवंताकडे रूपांतरीत होते. देहबुद्धी कमी होते. भक्ताच्या जीवनात संकटे आली तरी तो विचलीत होत नाही. रामाचे चिंतन सुरू झाले की प्रापंचिक चिंता दूर पळतात. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
खुळे हस्तपादादि हे भग्न होती ।
दिठी मंद होवोनियां कर्ण जाती ।
तनू कंप सर्वांगी होती कळा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ ५ ॥
सरळ अर्थ – सतत बदलणे हा या सृष्टीचा नियम आहे. ‘यद्दृष्टं तन्नष्टं’ जे दिसते ते सतत बदलत असते, कायमस्वरूपी असे येथे काहीही नाही. हात खुळे होतील, पाय तुटतील, नजर कमजोर होईल, कानही काम करेनासे होतील, शरीराला कंप सुटेल. तारुण्यात सौंदर्याने-शक्तीने रसरसलेला देह कमजोर होणार हे निश्चित आहे. मग आज आत्ता ताबडतोब नामाला लागावे आणि हरे राम हा सोपा मंत्र जपावा.
श्रीसमर्थांचा बोध – दुर्लभ नरदेह पूर्वपुण्याईने लाभला तरी तो काही शाश्वत नाही. बाल्य-तारूण्य-वृद्धत्व या देहाच्या मर्यादा आहेत. वेळ-काळाचेही बंधन आहेच. तसेच हा मानवी देह कर्माच्या सिद्धांतानुसार सुख-दुःख भोगत असतो. श्रीसमर्थ करूणाष्टकात म्हणतात.. “सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले ।” सुखाच्या शिखरावर असताना अचानकपणे काहीतरी असे प्रसंग घडतात, माणूस मोडून पडतो. हात तुटतात, पाय मोडतो. जोषात चालू असलेले काम थांबते. दबक्या पावलाने वृद्धत्व पुढ्यात उभे राहाते. दृष्टी मंद होते, ऐकायला कमी येऊ लागते, दंतपंक्ती जागा सोडू लागतात, त्वचा सुरकुत्यांनी भरून जाते. प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे अध्यात्मिक-आधिभूतिक-आधिदैविक ताप तर भोगणे क्रमप्राप्त असते. या सर्व जंजाळातून भगवंताचे नाम घेण्यास वेळ मिळत नाही. मृत्यू समोर दिसू लागला की देव आठवतो. तोपर्यंत वेळ हाताच्या बंद मुठीतून वाळू गळून जावी तशी निघुन गेलेली असते. म्हणूनच श्रीसमर्थ कळकळीची विनंती करतात भल्या माणसांनो, अंगात ताकद आहे; शक्ती आहे तोपर्यंतच स्वतःला नाम घेण्याची सवय लावून घ्यावी. नाम घेताघेता नामाची गोडी आपोआप लागेल. म्हणूनच सातत्याने हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
कफे कंठ हा रोध होईल जेव्हां ।
अकस्मात तो प्राण जाईल तेंव्हां ।
तुला कोण तेथें सखे सोयरे रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ ६ ॥
सरळ अर्थ – कफाने घसा भरलेला असल्याने आवाज निघत नाही. बोलायचा प्रयत्न केला तरी शब्द न फुटता भलताच आवाज येतो. बहुतेक या स्थितीला लोक घर घर लागली असे म्हणत असावेत. आणि अचानक प्राणपक्षी उडून जातो. तो जिथे जातो तिथे आपले म्हणावे असे सखे, सोयरे कोणीही नसतात. जिवंत असताना केलेल्या भगवंताच्या नामस्मरणाची तेवढी सोबत असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
श्रीसमर्थांचा बोध – मनुष्याच्या जीवनातील अटळ आणि निश्चित गोष्ट म्हणजे मरण. जन्माला आला त्याच क्षणी मरण निश्चित झाले. ‘नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।’ हे माणूस विसरतो आणि अमर असल्याप्रमाणे विषय-विकाराच्या उपभोगात रमतो, गुंतून पडतो. अलौकिक असा नरदेह प्राप्त होऊनही हा जीव आपले ‘स्व-हीत’ साधत नाही. प्राप्त झालेल्या सुवर्णसंधीचा उपयोग न करता उपभोगाच्या बेहोशीत मरणाच्या दिशेने वाटचाल करतो. तारुण्याच्या मस्तीत देवधर्म करत नाही. हा माझा; तो माझा; ‘कन्या पुत्र दारा सगे सोयरे ते’ सगळ्यांचा आधार वाटतो. पण वेळ आली की कोणी कोणाचे नसते हे माणसाच्या लक्षात येत नाही. मानवेतर प्राण्यांपेक्षा मनुष्यास देवाने दिलेली बुद्धि आणि मन सर्वात जास्त विकसीत तसेच प्रगल्भ आहे. माणसाला भल्या-बुऱ्याची जाण असते. तो विवेकाने आपले कर्म बदलू शकतो. परमेश्वराने कर्मनिवडीचे स्वातंत्र्य फक्त माणसाला दिले आहे. तरीही मृत्यू जवळ आल्यावर सुद्धा नामस्मरण करावे असे वाटत नाही. सग्यासोयऱ्यांवर विश्वास असतो तेवढा देवावर नसतो. एके दिवशी अचानक मृत्यू गाठतो. कधी आजारपणाने कधी वृद्धत्वाकडे तर कधी अपघाताने मृत्यूलोक सोडून जावेच लागते. कुठे जातो? तिथे सगेसोयरे मदतीला येतात का? उत्तर आहे नाही. म्हणूनच परमार्थात प्रत्येकाने स्वार्थी = स्व+अर्थी असावे. आपले हित आपणच पहायचे असते. आपण जन्मभर जे रामनाम घेतो तेच अंतीम प्रवासात आपल्यासोबत असते. आपला स्वार्थ, आपले हित फक्त आणि फक्त नामस्मरणात साठवलेले आहे त्यासाठीच श्रीसमर्थ म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
|| जय श्रीराम ||