हे बोधवाक्य घेऊन प.पू.अक्कास्वामी वेलणकर यांनी १९८४ साली सुरू केलेला दासबोध सखोल अभ्यास उपक्रम, त्यांच्यानंतर आ. वसंतराव गाडगीळ, आ. सुहास आगरकर आणि २०१८ पासून विद्यमान संचालक आ. विजय लाड समर्थपणे सांभाळत आहेत. ‘उत्कट साधक निर्माण करणे’ याच ध्येयाने प. पू. अक्कास्वामींनी उपक्रमासाठी एक नियमावली तयार केली. त्यात काही अनुकुल बदल झाले आणि उपक्रमाच्या कीर्तीचा आलेख चढत्या क्रमानेच ठेवला आहे.
या उपक्रमाअंतर्गत चालणा-या कार्याची वैशिष्ट्ये –
• या उपक्रमाच्या प्रवेशाची कुठेही जाहीरात केली जात नाही.
• जून ते सप्टेंबर या कालावधीत उपक्रमात प्रवेश दिले जातात.
• पत्रद्वारा दासबोध अभ्यास किंवा समर्थ विद्यापीठाची प्राज्ञ परीक्षा उत्तीर्ण असणारे साधकच या उपक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतात.
• प्रवेशासाठी स्वाध्याय म्हणून एक प्रश्नपत्रिका पाठवली जाते आणि तो स्वाध्याय समाधानकारक असेल तरच उपक्रमात प्रवेश दिला जातो.
• स्वाध्याय सोडवताना दासबोधासोबत मनोबोध, भगवद्गीता आणि समर्थचरित्र यांचा अभ्यासक्रमात समावेश असल्याने अभ्यासार्थीचा हा ही अभ्यास होतो.
• पाच ते सात वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर गौरवपत्र दिले जाते.
• २०० स्वाध्याय पूर्ण झालेल्या अभ्यासार्थींचा सत्कार प.पू. अक्कास्वामी वेलणकर यांनी ठरवून दिल्याप्रमाणे होतो.
• दा.स.अ. उपक्रमात समीक्षकांची सुद्धा निवडप्रक्रिया प. पू. अक्कास्वामी वेलणकरांनी ठरवून दिली आहे.
• निवड झालेल्या समीक्षकांसाठी ‘समीक्षकांचा स्वाध्याय’ हा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे.
• २०० स्वाध्याय पूर्ण झालेल्या अभ्यासार्थींना ती. लीलाताई व वसंतराव गाडगीळ यांनी ठरवून दिलेला पुरवणी अभ्यासक्रम करता येतो.
• दरवर्षी कोजागरी पोर्णिमेपासून सात दिवस या उपक्रमातील अभ्यासार्थी, समीक्षक आणि मार्गदर्शक यांच्या साठी साधना सप्ताहाचे आयोजन, श्री दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान असलेल्या पवित्र शिवथर घळीत केले जाते.
• २०२५ हे साधना सप्ताहाचे चाळीसावे वर्ष आहे.
• समीक्षकांसाठी सुद्धा दोन दिवसीय ‘समीक्षक मेळावा’ दरवर्षी घेतला जातो. या मेळाव्या मध्ये समीक्षकांच्या अडचणी, प्रतिक्रिया व उपक्रमाच्या गुणवत्ते बाबत चर्चा होते.
• या उपक्रमातर्फ़े समर्थ रामदासस्वामी साहित्य शोध हे समर्थ रामदासस्वामींच्या सर्व साहित्याला डिजीटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ चालविले जाते. त्या संकेतस्थळावर पुढील लिंकने जॉईन होता येते.
https://ramdasswami-sahityashodh.in/GranthList.aspx
• या उपक्रमातर्फ़े दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ सुंदरमठ सेवा समितीला जुलै २०२१ मध्ये प्रलयकारी पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर रुपये अकरा लाख अकरा हजार एकशे एक देणगी दिली होती.