स्थूल देह

स्थूल देह
सौ. पुष्पा प्रभुणे
  • July 6, 2025
  • 1 min read

आपण प्रत्येक प्राणीमात्रांची जी शरीरे बघतो ती सर्व हात, पाय, कान, नाक, डोळे वगैरे सर्व अवयवांनी तयार झालेली असतात. ती सारी स्थूल शरीरे म्हटली जातात. माणसाचे शरीर हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. यातील प्रत्येक तत्त्व जड आहे. म्हणजेच त्या तत्त्वाला स्वतंत्र अशी चेतना नाही. उदाहरणार्थ – माझा हात जोपर्यंत माझ्या शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंत तो हालचाल करू शकतो. तसेच माझे इतर अवयवांचे आहे. माझा हात, माझा पाय, किंवा इतर कोणताही अवयव जर माझ्या शरीरापासून वेगळा केला, तर तो हालचाल करू शकणार नाही. किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. वेगवेगळे स्पेअर पार्ट्स जोडून एखादी स्कूटर तयार करावी, त्याप्रमाणे माझे शरीर म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची जोड आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांचे पंचवीस गुण मिळवून स्थूलदेह बनतो. या स्थूल देहाची पंचवीस तत्त्वे अशी आहेत. 

पहिले भूत पंचक : यामध्ये आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी येतात. 

दुसरे विषय पंचक : यामध्ये स्पर्श, रूप, शब्द, रस, गंध ही पाच तत्त्वे येतात.

तिसरे अंत:करण पंचक : यामध्ये प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही पाच तत्त्वे येतात.

चौथे प्राण पंचक : यात व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण ही पाच  तत्त्वे येतात. 

पाचवे ज्ञानेंद्रिय पंचक : यात  कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही पाच तत्त्वे येतात. कर्मेंद्रियात वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद अशी पाच तत्त्वे आहेत. 

आपण आपल्या स्थूल देहाचा विचार करीत आहोत. हे सारे दृश्य जगत पंचभूतांनी नटलेले आहे. आणि आपले शरीरही या जगताचाच एक घटक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच महाभूते आहेत. अर्थात जे माता-पित्यांच्या रज-वीर्यापासून उत्पन्न होत असते, त्याला स्थूल शरीर म्हणतात. याचे दुसरे नाव अन्नमय कोश आहे. कारण हे अन्नाच्या विकारापासून उत्पन्न होत असते आणि जिवंत रहाते. म्हणून हे अन्नस्वरूपच आहे. इंद्रियांना विषय असल्याने हे शरीर “इदम” असे म्हटले जाते. मनुष्याला यापासूनच बुद्धीपर्यंतचे ज्ञान होते. परंतु बुद्धीच्या पुढील ज्ञान होत नाही म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. श्रीमद् भगवद्गीतेत या शरीराला क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे. जसे शेतात निरनिराळी बीजे पेरून पिके घेतली जातात, तसेच या मनुष्य शरीरात अहंता; ममता धारण करून जीव अनेक प्रकारचे कर्म करीत असतो. त्या कर्माचे संस्कार जेव्हा फळाच्या रूपात प्रकट होतात, तेव्हा देवता; पशु; पक्षी; कीटक; पतंग; इत्यादी शरीरे मिळत असतात. शेतात आपण जसे बीज पेरू तसे धान्य उत्पन्न होते. त्याचप्रमाणे शरीराने जशी कर्म केली जातात, त्यानुसार  शरीर; परिस्थिती; इत्यादी प्राप्त होतात.

तात्पर्य, या शरीरात केलेल्या कर्मानुसारच हा जीव वारंवार जन्म-मरणरूपी फळ भोगत असतो. प्रत्येक निर्मित वस्तू कालबद्ध असल्यामुळे ती सतत बदलत असते, गतिमान असते; ती तिच्या विनाशाकडे हळूहळू जात असते. सतत परिवर्तन हे तर विश्वाचं स्वरूपच आहे. वस्तूमध्ये अनेकत्व असतंच. ह्या विश्वात अगणित नामं आणि रूपं आहेत. आता हे सर्व आपल्या शरीराला लावून पाहायचं आहे, कारण या शरीराला “इदम” म्हटलं आहे. आपण आपल्या शरीराला मात्र “अहं”, “मी” किंवा मम म्हणजे माझं असं समजत असतो. तसं पाहिलं तर हे पुस्तकही माझं आहे, पण ते मी आहे असं मला कधी वाटत नाही. त्या पुस्तकाची सुखदुःख ती माझी  नाहीत. कुठलीही वस्तू खराब झाली तर आपण तिचा सहज त्याग करतो. मग शरीर माझं आहे, त्याचं दुखणं हे माझं दुखणं; त्याला भूक लागली की मला भूक लागली; असं मला का वाटतं/ पटतं? कारण ते नुसतं माझं नाही तर ते म्हणजे मीच आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. शरीराला वेगळे पहाणे हे फार महत्त्वाचे आहे. असे पहाणे फक्त साधकासाठी नाही तर प्रत्येक मनुष्यमात्रासाठी आवश्यक आहे. कारण स्वतःचा  उद्धार करण्याचा अवसर फक्त मनुष्य शरीरातच आहे.

आता आपल्याला या स्थूल शरीराच्या माध्यमातून सूक्ष्म असणारा अंतरात्मा जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी या स्थूल देहाचाच आधार घ्यायचा आहे. आपण सुरुवातीलाच बघितले की, आपले शरीर मग ते स्थूल असो वा सूक्ष्म असो, तत्त्वांचे गाठोडे आहे. आणि ही सारी तत्त्वे जड आहेत. याचा अर्थ असा आहे की, या साऱ्या तत्त्वांना स्वतंत्र जाणीव नाही, चेतना नाही. आपला प्रत्येक अवयव जोपर्यंत शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंतच तो कार्य करू शकतो. यातील कोणताही अवयव जर वेगळा केला, तर हालचाल करू शकणार नाही, किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. आता आपले जे शरीर आहे, ते जड आहे; त्याला वजन आहे का? तर आहे. माझ्यातील ते ‘पृथ्वी तत्व’ आहे. आता पृथ्वी म्हटले की, आपल्यासमोर पृथ्वीचा म्हणजेच ब्रह्मांडाचा मोठा आकार उभा रहातो. पण आपल्या स्थूलदेहातील पृथ्वी तत्त्व म्हणजे, माझी हाडे; मांस; त्वच नाडी व रोम. या सर्वांनाच आकार आणि वजन आहे. आणि तेच माझ्यातील पृथ्वी तत्त्व होय.

आता माझ्यातील पृथ्वी तत्त्वाला स्वतंत्र चेतना आणि स्वतंत्र अस्तित्व नाही, त्याला जाणीवही नाही. त्याचप्रमाणे त्यात सतत बदल होत असतो, म्हणून पृथ्वी तत्त्व हे काही माझे खरे स्वरूप नाही. आता आपण जेव्हा आपाचा विचार करतो तेव्हा माझ्यातील/माझ्या शरीरातील रक्त, लाळ, रेत, मूत्र व घाम हे माझ्यातील ‘आपतत्त्व’ आहे. माझ्या शरीरात रक्ताचा प्रवाह चालू आहे, ते माझ्यातील आप तत्त्व  आहे. शरीरात असा ओलसरपणा आहे म्हणून माझी हाडे लवचिक आहेत. माझ्या शरीरातील आप तत्त्व नश्वर आहे. या आप तत्त्वाला स्वतःची अशी स्वतंत्र जाणीव नाही. म्हणून ते आपतत्त्व हे माझे खरे स्वरूप नव्हे.

तसेच तेजाच्या बाबतीतही म्हणता येते. आपण ९७ ते ११० या तापमानात जगत असतो. आता भूक, तहान, आळस, झोप, मैथुन ही माझ्यातील ‘तेज तत्त्वं’ आहेत. परंतु, या साऱ्या गोष्टी मानसिक असून जड आहेत. त्यांना स्वतःची अशी स्वतंत्र चेतना नाही, म्हणून तेज हे माझे खरे स्वरूप नाही.

तसेच वायूच्या बाबतीतही म्हणता येते. मी श्वासोच्छ्वास घेतो. त्यावरून, माझ्यात वायू तत्त्व आहे. ते सूक्ष्म असले तरी, शेवटी जड तत्त्वच आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, म्हणजे ते माझे स्वरूप नाही. आकाश तत्त्व सर्वात सूक्ष्म आहे. माझ्या शरीरात अवकाश म्हणजेच पोकळी आहे. म्हणून काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे वृत्तीचे तरंग अंत:करणात उमटू शकतात. २४ तास रक्ताभिसरण सुरू असते, ते सूक्ष्म आहे. पण, त्यालाही जडत्व आहे. म्हणजेच आकाश सुद्धा माझे खरे स्वरूप नाही. 

आपण स्थूल देहाच्या आठ अवस्था बघितल्या आहेत. स्थूल देहामध्ये जागृती अवस्था असते, तेव्हा इंद्रिय जागृत असतात. त्यामुळे सारे व्यवहार सुरळीत व सुसंगत होत असतात. आणि त्यातूनच मी कर्ता हा त्याचा अभिमान असतो. तो विश्वातील प्रत्येक योनीत असतो. या साऱ्या गोष्टीचा आत्मानात्मक विवेक आपण करतो, तेव्हा बुद्धी आत्मसन्मुख होते. हळूहळू ती सूक्ष्म होत जाते. आणि मग आपण ईश्वराच्या अस्तित्वाविषयी नि:शंक होतो; वासना क्षीण होऊन रामकर्ता भावना निर्माण होत वृत्ती शांत होते. या साऱ्या गोष्टी गुरुच्या सान्निध्यातच आपल्याला कळायला लागतात. आणि आपला साधनेचा प्रवास सुखाने सुरू होतो. म्हणून सत्शास्त्राचे श्रवण सतत करावे. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवावा.

जय जय रघुवीर समर्थ

Language