श्रीराममंत्राचे श्लोक

श्रीराममंत्राचे श्लोक
सौ. स्नेहल पाशुपत
  • June 27, 2025
  • 1 min read

श्रीसमर्थ श्रीरामभक्त आहेत. श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू, त्यांचे आराध्य, त्यांचे सर्वस्व आहेत. श्रीराम श्रीसमर्थांसाठी देवांचाही देव आहेत. कारण, “राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण । राम धर्माचे रक्षण । संरक्षण दासांचे ॥” धर्माचा पक्ष घेऊन धर्मरक्षण करणारे श्रीराम अद्वितीयच आहेत. प्रभूश्रीरामचंद्रांचे वर्णन करताना श्रीसमर्थांचे ह्रदय उचंबळून येते. त्यांच्या प्रतिभेला नवनवे पांगारे फुटतात. 

श्रीराम रूपाने सर्वांग सुंदर, करुणेचे सागर, त्रैलोक्याचे प्राण, दीनानाथ, उद्धारक आहेत. कल्याणाचे कल्याण, मंगळाचे मंगळ, प्रत्यक्ष कैवल्यदानी, सूर्यवंशाचे मंडण, अशा अनेक शब्दालंकारांनी श्रीरामांचे सगुणरूप आळवणे श्रीसमर्थांना फार आवडते. श्रीरामांकडे अगणित गुणसंपदा आहे, परंतु श्रीसमर्थ रामरायाच्या महान पराक्रमावर जास्त प्रेम करतात. अवघ्या देवांना रावणाच्या बंदीशाळेतून सोडविण्याचे कार्य, अन्य कोणालाही करता आलेले नाही ते श्रीरामांरानी केले म्हणून श्रीराम, श्रीसमर्थांचा आवडता देव आहे. काही घडणे किंवा बिघडणे सर्व रामरायाच्याच हाती आहे, अशी श्रीसमर्थांची दृढ श्रद्धा आहे. 

श्रीसमर्थांनी रामभक्तीपर, रामगुणवर्णनपर, रामराज्य सांगणारे असंख्य श्लोक, पदे-अभंग लिहिले आहेत. त्यात ४९ श्लोक असलेले राममंत्राचे स्फुट काव्य विशेष आहे. मनाच्या श्लोकांप्रमाणे अत्यंत ओजस्वी आणि मानवमात्राला सन्मार्गाच्या वाटेवर घेऊन जाणारे हे श्लोक प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावेत. यातून रामनामाचा सरल-सोपा मंत्र निरंतर जपण्याचा आग्रह श्रीसमर्थ साधकाला करतात. माणसाचा जन्म ‘बहुत सूकृताने’ लाभतो. तो आत्मोद्धारासाठी सन्मार्गाने झिजवायचा असतो. अन्यथा फक्त उपभोगाने देहाचा नाश होतो व सहजी मिळालेली संधी हुकते. म्हणूनच श्रीसमर्थ परत परत सांगतात “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”. या एकेका श्लोकातून श्रीसमर्थ नामस्मरणाची सोपी वाट जनसामान्यांसाठी मोकळी करत आहेत. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. १

नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी ।

जडे गर्व ताठा अभिमान पोटीं ।

कसा कोणता नेणेवे आजपा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १॥

आपल्याला भगवंताचे दर्शन घडावे, किमानपक्षी काही अनुभव तरी यावा, असे प्रत्येकालाच आतून वाटत असते. आणि त्यासाठी बरेच लोक आपापल्या मनाने काहीबाही प्रयत्न करत असतात. मात्र फारच कमी लोकांना त्यात थोडेफार यश मिळते, तर अगदी एखाद दुसर्‍यालाच भगवंताचे दर्शन घडून ‘तो’ दिव्य अनुभव येतो. याचे कारण श्रीसमर्थ म्हणतात तसे, “परंतु त्यांची निष्ठा कांहीं |  तैसीच नसे ।” माणसाची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि देवाशी केली जाणारी वागणूक, दोन्ही खऱ्या नसतात. सगळाच दांभिकपणा. खऱ्या भक्तीत भाव महत्वाचा असतो. कर्मयोगात शारीरिक, आर्थिक शक्ती लागते. ज्ञानमार्गात बौद्धिक शक्ती महत्वाची असते, शास्त्रग्रंथांचे अध्ययन; पाठांतर करावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात सिद्धी, कीर्ती, पद, प्रतिष्ठा प्राप्त तर होते, पण त्यातून अहंकार दुणावतो. स्पर्धा, ईर्षा वाढून तीच माणसाच्या पतनाला कारण ठरते. योग मार्गाचा अवलंब करताना आसन, प्राणायाम, अस्तेय, अपरिग्रह अशी अनेक विधिविधाने सांभाळावी लागतात, ती साधताना कठीण वाटू लागते. अजपाजप समजून घेणे फारच अवघड आणि प्रत्यक्ष साधणे तर दूरच रहाते. म्हणूनच सरळ सोपा भक्तिमार्ग, आणि त्यातही नामस्मरण करणे सामान्य जनांना सुलभ आहे. त्यात काही कष्ट नाही आणि खर्चही करावा लागत नाही. सर्वच संतांनी एकमुखाने नामस्मरण करण्यावर विशेष भर दिलेला आहे. आपले श्रीसमर्थ तर श्रीरामभक्त आहेत. त्यांनी निरंतर रामनामाचा उद्घोष केला. ते स्पष्टपणे सांगतात की, मला जे काही प्राप्त झाले ते या रामनामानेच. म्हणून तुम्ही सुद्धा साधे सरळ सोपे रामनाम नित्य जपावे व स्वहित साधावे. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. २ 

नको कंठ शोषू बहू वेदपाठी ।

नको तूं पडूं साधनांचे कपाटी ।

घडे कर्म खोटें बहू तो दगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२॥

सरल अर्थ – वेदांचे काही शिक्षण नसताना, अर्थात ज्ञान नसताना वेदांचे पाठांतर करणे, फुकाचा कंठशोष ठरतो. तसे कोणी करतो म्हणून आपण साधना करणे एक प्रकारे बंधनात अडकणे होय. हातून घडणारे हे कर्म, म्हणजे निव्वळ स्वतःच स्वतःची केलेली फसवणूकच असते. म्हणून ‘हरे राम’ या सोप्या मंत्राचा जप करावा.

श्रीसमर्थांचा बोध – पहिल्या श्लोकात सांगतात, शास्त्रांचा अभ्यास नको. आता म्हणतात वेदपाठ करणे, साधना करणे ही कर्मं सारे फसवे आहे. मग हे करणारे चुकीचे असतात का? नाही. तसे श्रीसमर्थांना म्हणायचे नाही. प्रत्येक कर्म हे अधिकाराशिवाय करणे धोक्याचे असते. वेदपाठ करण्यासाठी काही अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. तीच गोष्ट साधन करण्याची सुद्धा आहे. अधिकारी व्यक्तीकडून, सदगुरूंकडून मिळालेले साधन श्रद्धेने, निष्ठेने करायचे असते. त्या मागे त्या अधिकारी व्यक्तीचे तप जोडलेले असते. केवळ आपल्या मनाने केलेले पाठांतर, साधन फक्त ‘पाट्या टाकणे’ असते; पोपटपंची असते. त्याने वृथा श्रम होतात, हाती काही लागत नाही. योग्य अधिकाराशिवाय केलेल्या कर्माने गती प्राप्त न होता अधोगती होण्याचीच शक्यता जास्त असते. नामसाधना एकमेव अशी साधना आहे की तेथे फारसे नियम नाही, कठोर बंधने नाहीत, बाह्य साधनांची आवश्यकता नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, “पेढा जसा कसाही खावा, गोडच लागतो. तसे नाम कसेही घ्यावे ते काम करणारच”. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

जय श्रीराम. 

Language