श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग दुसरा

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग दुसरा
डॉ. सौ. साधना गोखले
  • June 15, 2025
  • 1 min read

आपल्या देशाटणाच्या काळात श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले होते. अस्मानी सुलतानी संकटाने पिचलेली, मदांध सत्तेच्या अन्यायाखाली भरडली जाणारी मराठी जनता पहाताना त्यांचं काळीज पिळवटून गेलं होतं. हया समाजाला धीर देऊन संघटित करण्याची नितांत गरज होती. म्हणूनच “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका” असे समजावीत “वन्ही तो चेतवावा रे | चेतविताचि चेततो” हया धारणेने श्रीसमर्थांनी लोक जागरणाची मशाल हाती घेतली. श्रीसमर्थांनी संघटनेचे कौशल्य आपल्या आराध्याच्या अर्थात श्रीरामचंद्रांच्या चरित्रातून घेतले व तेच पराक्रमाचे, आत्मविश्वासाचे स्फुलिंग समाजात जागविण्यासाठी त्या कोदंडधारी श्रीरामांचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. चळवळीचे सामर्थ्य पटवून दिले. 

“सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें ||

परंतु येथें भगवंतांचे | अधिष्ठान पाहिजे ||”

हया दृढ धारणेनेच त्यांनी रामकथा “ब्रम्हांड भेदून पैल” नेण्याचा अखंड प्रयास केला. हया साऱ्या प्रयासात त्यांचा “कैवारी” होता श्रीहनुमंत. श्रीरामांचा अनन्य दूत.

“मनोजवं मारुततुल्यवेगं | जितेंद्रियं बुध्दिमतां वरिष्ठम् |

वातात्मजं वानरयूथमुख्यं | श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||”

शक्ती, बुध्दी, युक्ति, त्याग, सेवा, श्रध्दा, साहस व निष्काम कर्मयोग अशा  अपूर्व गुणसमुच्चय असलेल्या श्रीहनुमंताचा आदर्श समोर ठेवून श्रीसमर्थ कार्य करीत होते. श्रीहनुमंतासारखेच सर्वांनी बलसंपन्न व्हावे म्हणून त्यांनी ठिकठिकाणी मारुती मंदिरे उभारली. अकराशे मठ व त्यावर अकराशे मठपतींची नियुक्ती केली. श्रीहनुमंताचाच धूर्तपणा व मुत्सददीपणा दाखवीत त्यांनी शिवाजीराजांना मदत केली. आपल्या शिष्यांच्या माध्यमांतून त्यांनी मोगल सत्ताधीशांच्या हालचालींच्या बित्तंबातम्या काढल्या, त्या गुप्त राखून शिवाजीराजांपर्यंत पोहोचविल्या. योग्य ती सल्लामसलतही केली. “राजकारण बहुत करावें | परंतु कळोंच नेदावें ||” इतक्या सावधपणे वागून त्यांनी संपूर्ण देशभर आपलं “नेटवर्क” उभारलं होतं.

परमप्रतापी, महाबली असूनही आपल्या बळाचा अहंकार श्रीहनुमंतांनी कधी केली नाही. तसेच सर्व सिध्दी प्राप्त असूनही त्या शक्तींचा उपयोग श्रीसमर्थांनी लोक कल्याणासाठीच केला. श्रीहनुमंताचा पराक्रम व दास्यभावाचं प्रतिक म्हणून श्रीसमर्थांनी “दासमारुती” व “वीरमारुती” अशा दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. गुरुपदाधिष्ठित होऊनही मारुतरायांसारखंच आपलं दास्यत्व श्रीसमर्थांनी कधीही सोडलं नाही. ते स्वत:ला “रामदास” म्हणवत व श्रीरामचंद्रांना “समर्थ” म्हणत.

आमचे कुळीं रघुनाथ | रघुनाथें आमुचा परमार्थ ||

जो समर्थांचाहि समर्थ  |  देवां सोडविता || दा. ६-७-२१||

  रघुनाथभजनें ज्ञान जालें  | रघुनाथभजनें  महत्व वाढलें | ६-७-३१||” 

हे रामभक्तीचे बळ  श्रीहनुमंतांनी दिले. म्हणून श्रीसमर्थ कृतज्ञतेने  म्हणतात, –

“हनुमंत आमुची कुळवल्ली | राममंडपा वेला गेली |

श्रीराम भक्तीने फळली  |  रामदास बोले या नांवे ||

आमुचे कुळीं  हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |

तयावीण आमुचा परमार्थ | सिध्दीतें  न पवे सर्वथा ||

साहय आम्हांसी हनुमंत | आराध्य दैवत श्रीरघुनाथ |”

श्रीसमर्थांना, श्रीहनुमंताचे अनेक प्रसंगी साहय झाल्याचे दाखले मिळतात. कोणताही कठीण प्रसंग येवो, श्रीहनुमंत तेथे तत्परतेने हजर होत. बेदरला श्रीसमर्थ शिष्यांचे संरक्षण करण्यासाठी ते लगेच आले. पाडळी गावच्या मुस्लिम अंमलदाराला अददल घडविण्यासाठी त्यांनी गावालाच आग लावली. नंतर श्रीसमर्थांच्या विनंतीवरुन ती विझवलीही.

मसूरच्या पश्चिमेस चार मैलांवर उंब्रज गाव आहे. इथे श्रीसमर्थ चाफळ मुक्कामी असले की स्नानास जात. एकदा स्नान करतांना ते “बुडालो बुडालो” असे ओरडले. शिष्य मदतीला येण्यापूर्वीच मारुतीरायांनी खडकावरुन नदीपात्रात उडी मारली व श्रीसमर्थांना बाहेर काढले. एवढी त्यांची तत्परता असे. श्रीसमर्थ म्हणत,

बलभीम माझा सखा सहोदर | निवारी दुस्तर  तापत्रय |

ठेवा संचिताचा मम उघडला | कैवारी जोडला हनुमंत |

हनुमंत माझे अंगीचें कवच | मग भय कैचें दास म्हणे |

रामरायाला नैवेद्य अर्पण केल्या खेरीज श्रीसमर्थ अन्नग्रहण करीत नसत. कधी कधी त्यांचा सखा सहोदर श्रीहनुमंत त्यांच्या समवेत प्रसाद भोजन घ्यायला हजर असे. श्हापूरच्या सतीबाईंना हयाची प्रचिती आली होती. वामन पंडितांना देखील श्रीसमर्थांच्या जागीच श्रीहनुमंताचे दर्शन घडले होते.

श्रीहनुमंत हे अकरावे रुद्र आहेत. म्हणून अकरा हा आकडा श्रीसमर्थांचाही आवडता आहे. श्रीसमर्थांनी स्वत:चे शिक्षण फारच झटपट उरकले याबददल गिरीधरस्वामी म्हणत,

“समर्थें अकरा घडयात केले धूळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसे केला जमाखर्च सुंदर |

ब्रम्हांड कुलकर्ण चालवावया ||”

श्रीसमर्थांनी देशभरात अकराशे मठांची स्थापना करुन त्यानंतर अकराशे महंतांची निवड केली होती. त्यांनी ठिकठिकाणी मारुतरायाची मंदिरे स्थापन केली पण त्यातील अकरा मारुती विशेष प्रसिध्द आहेत. मिरजच्या मठपती श्रीसमर्थ शिष्या वेणास्वामी हयांनी अकरा मारुतींना एका अभंगात गुंफून त्यांना शब्दमाला अर्पण केली आहे त्या म्हणतात,

“चाफळामाजी दोन उंब्रजेसी एक |

पारगांवी देख चौथा तो हा ||१||

पांचवा मसुरी, शहापुरी सहावा |

जाण तो सातवा शिराळयांत ||२||

सिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा |

दहावा जाणावा माजगावी ||३||

बाहयांत अकरावा येणे रीती गावा |

सर्व मनोरथा पुरवील ||४||

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास |

कीर्ती गगनात न समावे ||५||” 

श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताची जी स्तुती स्तोत्रे रचली आहेत ती जवळजवळ पंचवीस आहेत पण त्यातील अकरा स्तोत्रे विशेष प्रसिध्द आहेत.

त्यातील “फणिवर उठविला” हया स्तोत्रात श्रीसमर्थ श्रीहनुमंतास आर्ततेने म्हणतात –

“तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे |

म्हणउनि मन माझें रे तुझी वा पाहे |

मज तुज निरविलें पाहिजे आठवीलें |

सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ||”

श्रीसमर्थ आणि श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध असे गहिरे आहेत. दृढ भावभक्तीने भारावलेले आहेत.

नुकतीच एक लौकिक कथा ऐकायला मिळाली. श्रीसमर्थांनी भीमरुपी महारुद्रा हे सुप्रसिध्द स्तोत्र रचण्यास सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष श्रीहनुमंत समोर प्रकट झाले. जसजशी स्तोत्ररचना होत होती तसतसे श्रीहनुमंत श्रीसमर्थांच्या निकट येत होते व स्तोत्र समाप्त होते वेळी ते श्रीसमर्थांच्या देहात लुप्त झाले.

हया लौकिक कथेत सत्यांश किती हा मत मतांतराचा भाग असू शकतो पण श्रीहनुमंत व श्रीसमर्थ हयांच्यात किती अद्वैत होतं किंवा उत्कट भावबंध होता हे मात्र हया कथेतून अधोरेखित होतेच होते!

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language