श्रीसमर्थ रामदास स्वामी

श्रीसमर्थ रामदास स्वामी
सौ.स्वरूपा कुलकर्णी
  • May 31, 2025
  • 1 min read

धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

झाले आहेत पुढे होणार | देणे ईश्वराचे ||

श्रीसमर्थ रामदास स्वामी

संत म्हणजे संतांचे वाङ्मय!  चिरकाल मार्गदर्शन करणारा तत्त्वज्ञान बोध! ती संतांची चिरंतन साक्ष आहे. श्रीमद्भगवद्गीते सारख्या स्मृती ग्रंथांपासून संत वाङ्मयापर्यंत हजारो वर्ष तत्त्वचिंतक, कीर्तन, प्रवचनकार या आध्यात्मिक ग्रंथांवरील चिंतन प्रगट करीत आलेले आहेत. श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य, टीका, निरूपण, वाङ्मय व मौखिक प्रबोधनाची तर गणतीच नाही. 

     उपनिषदे आणि भगवद्गीता या दोन संस्कृत ग्रंथांनी सबंध भारतामध्ये अध्यात्माची जोपासना केली. पण महाराष्ट्रामध्ये मात्र श्रीज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आणि श्रीसमर्थांचा दासबोध या दोन संत ग्रंथांनी आजपर्यंत शुद्ध अध्यात्म जिवंत ठेवले आहे. श्रीज्ञानेश्वर आणि श्रीसमर्थ दोघेही भक्तोत्तम होत. दोघेही मोठे साक्षात्कारी व ब्रह्मज्ञानी पुरुष होते. सच्चिदानंद स्वरूप परमात्म वस्तूचा साक्षात अनुभव घेऊन दोघेही परमात्म्यात स्थित झालेले अति मानव होते. दोघांच्या जीवनामध्ये अध्यात्मिक अनुभवाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. ती श्रीमंती दोघांनी आपल्या ग्रंथांद्वारे मराठी जनतेला मुक्त हस्ताने वाटली. अज्ञानी माणसे मी देहच आहे या निश्चयाने जीवन जगतात, त्यांना सारे दृश्य विश्वासारखेपणाने प्रचितीस येते. आत्मज्ञानी अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष “मी ब्रह्मच” आहे याविषयी पूर्ण ज्ञानी असतात. सर्व संतांना वस्तूंचे सारखेपण प्रचितीस येते म्हणून सर्व संतांचे परमात्मा स्वरूपाचे अनुभव मूलतः समान असतात. परमात्मा स्वरूपाच्या साक्षात दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेली संत मंडळी आत्मसाक्षात्कारानंतर स्वस्थ बसत नाहीत. आपल्या सभोवार पसरलेल्या मानव समूहातील लहान मोठ्या सर्व व्यक्तींनी सुखी जीवन जगावे, परमात्म वस्तूचे साक्षात दर्शन घ्यावे आणि आपल्यासारखे कृतार्थ होऊन जावे म्हणून ते जन्मभर खटपट करत असतात. लोककल्याणाच्या त्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, आपली वाणी, आणि लेखणी अक्षरश: अहोरात्र झिजवतात. हे सारे दिव्यपण श्रीसमर्थांच्या जीवनात उत्कटपणे बघायला मिळते. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यावर श्रीसमर्थांना आत्मसाक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यावर त्या शाश्वत मुख्यपदावर ते आरूढ झाले. त्यानंतर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभला. लोकांमध्ये समूह भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी कितीतरी मठ स्थापन केले. प्रत्येक मठात लोकशिक्षणाचे काम निस्वार्थपणे करणारे संन्यासी-महंत तयार केले. त्या सगळ्या महंतांचे महंत म्हणून श्रीसमर्थांच्यापाठी मोठा व्याप होता. अगदी हजारो स्त्री पुरुष त्यांना भेटून गेले असणार. त्यापैकी कित्येकांशी ते कितीतरी अध्यात्मिक बोलले असणार. अनेकांना त्यांनी साधनेमध्ये, राजकारणामध्ये, व्यवहारांमध्ये, आणि व्यक्तिगत समस्यांमध्ये यथार्थ मार्गदर्शन केले होते. त्यांची ती संभाषणे, विनोदवचने व समस्या सोडवणे कालाच्या उदरात गडप झाली. परंतु आपल्या भाग्याने श्रीसमर्थांनी पुष्कळ वाङ्मय लिहूनही ठेवले आहे. त्यांच्या त्या वाङमय भांडारामध्ये श्रीमत् दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो. अध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे जिवंत तत्वज्ञान त्यांच्यापाशी होते. ते तत्त्वज्ञान त्यांचे दासबोधामध्ये एकत्र गुंफलेले आढळते.

       

श्रीसमर्थांच्या वाङ्मयापैकी काही पदे, काही आरत्या, करुणाष्टके, मनाचे श्लोक आणि दासबोध हे वाङ्मय  महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मराठी माणसाच्या मनावर त्याची पकड अजून कायम आहे. श्रीमत् दासबोध हा समर्थांचा प्रधान ग्रंथ होय. जगाला त्यांना जे सांगायचे होते ते त्यांनी दासबोधामध्ये स्वच्छपणे सांगून ठेवले आहे. त्या काळाच्या रितीप्रमाणे त्यांनी दासबोध ओवी मध्ये रचला.

आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ।

असता न करावा खेद । भक्तजनी ।।

नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।

येणे सायुज्जाची वाट । गवसेल की ।।

दासबोधाची  ओवी अगदी साधी, सरळ, सोपी व छोटी आहे. ती अधिक गद्य अनुकूलच आहे. श्रीसमर्थांना दासबोध गद्यांमध्ये सांगण्यात अधिक पसंत पडले असे वाटते. दासबोधाचे एकंदरीत वीस दशक आणि २०० समास आहेत. २०० समासांची ओवी संख्या ७,७५१ भरते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर थोडेच दिवसांनी श्रीसमर्थांनी दासबोध रचला. स्वस्वरूप अनुभूतीचा नवीनपणा व आवेश, आत्मज्ञानाचा निर्भयपणा, उपासनेचा निधडेपणा, साधनेचा स्पष्टपणा त्यामध्ये विशेष रीतीने आढळतो. श्रीसमर्थांनी खरोखरच उदंड वाङमय निर्माण केले. रामायणातील सुंदरकांड, अभंग, ओव्याशतके, पूर्वारंभ, अंतर्भाव, आत्माराम, चतुर्थमान, पंचमानक, मानपंचक, गोसावी, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, जुनाट पुरुष, षड्रिपुनिरूपण, पंचिकरण योग, मनाचे श्लोक, श्रीमत् दासबोध, इतर स्फूटप्रकरणे, काही ओवीबद्ध पत्रे, वगैरे त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये विवेकावर विलक्षण भर देणारे श्रीसमर्थ यत्नाला देव मानत असत, पण विवेकाला यत्नाची जोड देऊन व्यवहारात उतरवणारे तेच श्रीसमर्थ अंतकरणाने किती कोमल, प्रेमळ, उत्कट होते ही गोष्ट त्यांची करुणाष्टके वाचताना प्रकर्षाने प्रचितीला येते. त्यांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती यात शंकाच नाही. शिवाय ती अहोरात्र जागी असे. त्यांच्या प्रतिभेचा विशेष असा की जसे त्यांनी अनुभवले तसेच अगदी साध्या सरळ शब्दात त्यांनी व्यक्त केले. त्या सरळपणे व रोखठोकपणे मांडण्यात जे काव्य गुण येतील ते येतील. मराठी, हिंदी व उर्दू भाषा तर त्यांच्या दासीच होत्या. विषय सांगण्याचा ओघ मोठा गतिमान असल्याकारणाने त्या ओघामध्ये हिंदी, उर्दू, फारशी, अरबी व संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करतात. कित्येक ठिकाणी आपल्याला हवेत असे नवीन शब्द तयार करून त्यांनी विषय समजावून दिला आहे. त्यांची भाषा सोपी व सुटसुटीत दिसते.  मोजक्या शब्दात नेमका अर्थ निसंदिग्धपणे सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे गमक आहे. त्यांची ओवी दिसते छोटी पण अर्थाने मोठी गंभीर आहे. त्यांच्या इतके मानवी जीवन पाहिलेला आणि त्यावर सतत चिंतन केलेला महात्मा दुर्मिळ असतो. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रबळ गतिमानता होती म्हणून एखादा विषय ते सांगू लागले की त्या विषयाची अफाट माहिती त्यांच्या मनापुढे हात जोडून उभी राहत असे. अर्थात, त्यांच्या प्रतिपादनाला व भाषेला विलक्षण ओघ प्राप्त होतो. श्रीसमर्थ मोठे सिद्ध महानुभाव असल्याने त्यांची प्रतिभा अखेरपर्यंत अगदी जशीच्या तशीच टिकली. योगायोगाने कल्याण स्वामी सारखा अद्वितीय लेखनिक त्यांना भेटला.

श्रीसमर्थ म्हणतात –

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ।।

ब्रह्मज्ञान, भक्ती, गुरुपद, वाङमय, आणि विशाल लोकसंग्रह या पाचही अंगांनी वैभव संपन्न असलेले एकमेव संत म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामी!! धन्य रामदास! जय रघुवीर!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language