दासबोधात आत्मज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण अर्थ अभ्यासार्थींसमोर येतो. सारे विश्व ज्ञानवृत्तीतूनच निर्माण झाले म्हणून विश्वाच्या व्यवहारात योजना, व्यवस्था व विवेक आढळतो. प्रत्येक जीवात ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असतेच. अथ तो ब्रह्म जिज्ञासा। यातूनच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथात आत्मज्ञानाचा विचार आला. आत्मज्ञान म्हणजे आपले खरे स्वरुप पहाणे. ज्ञानाच्या कक्षा व्यापक आहेत. महावाक्याचे मनन, साधनचतुष्टय संपन्नता, अध्यात्म विद्या, सदगुरुकृपा उपदेश, श्रवण ते साक्षात्कार हा प्रवास, सत्त्वगुणाची वृद्धी, सोऽहं साधना अशा अनेक मार्गाने ज्ञानाची तत्त्वे उलगडतात. सर्व भूतांच्या ठिकाणी एकच एक परमात्मभाव ठेवणे, जे शुद्ध परमात्म स्वरुप आहे तेच आपण आहोत, अनिवार्य समाधानाची प्राप्ती, वृत्ती, देह व दृश्य जगातून काढून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर ठेवणे यासाठी आत्मज्ञानाचा विचार व साधना करावी लागते. ज्ञानाच्या सात भूमिकांचा विचार आपण येथे करणार आहोत.
१.शुभेच्छा– प्रत्येक जीवाची बद्धावस्था संपली की विषयभोगात सुख नाही हे कळते व ज्ञानाच्या जिज्ञासेपोटी सत्संग व अद्वैत ग्रंथाचा अभ्यास सुरु होतो. अभ्यास व ज्ञानाची जिज्ञासा याला शुभेच्छा म्हणतात. अनंत राघवाच्या पंथाचा प्रवास इथे सुरु होतो. मनाचे श्लोक ४ ते ७ मध्ये या प्रवासाला निघण्यापूर्वी कोणत्या अनित्य, अशाश्वत गोष्टींचा त्याग करावा याचा विचार आहे. त्याग ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. मंदिरातील उत्सव, लोककल्याणाची कामे, सत्संग, अभ्यास याकडे भोगाची आसक्ती व शक्ती वळते. हा प्रवास निर्विघ्न, सुखकर व्हावा म्हणून गणेश, शारदेचे आशिर्वाद व सदगुरुकृपा महत्त्वाची असते.
२.विचारणा– वाचन, अभ्यास वाढला की शंका येतात. ग्रंथात याला ‘ग्यानबाची मेख’ म्हणतात. तसे अवघड विषय, सूत्रे असतात. ती सदगुरुला विचारली जातात यालाच विचारणा म्हणतात. “तद् विद्धिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया” गीता ४.३४ या वचनांप्रमाणे अहंकाराचा लय, शरणागतता, नम्रता, लीनता असली तर योग्य मार्ग मिळतो. अहंकाराचा लय जितक्या वेगाने होईल तितके क्षुद्र विचार, गोष्टी, वायफळ बडबड, निंदा, स्तुती, कल्पनेची मनोराज्य या गोष्टी मनातून व वर्तनातून बाहेर पडतात.
३.तनुमानसा– साधना व अभ्यासासाठी दुर्लभ नरदेह व दुर्लभ आयुष्य याचे महत्त्व ओळखावे लागते. देह पंचभूतांचा, त्याला वृद्धत्व, मृत्यू असतोच म्हणून एकही क्षण वाया न घालवता तो सक्षम शुद्ध, सात्विक ठेवून प्रवास करावा लागतो. समर्थांना देशाटनात हिमालयात देहत्याग करावा वाटला पण प्रभू रामचंद्र प्रगट होऊन म्हणाले, तुमची तनु ते आमुची तनु आहे “दोन तपे रक्षिली तुमची काया धर्मस्थापनेसाठी” त्या नंतर ११00 मठ, महंत निर्मिती, गावोगावी मंदिर, प्रचंड वाङ्मय निर्मिती हे कार्य समर्थांनी केले.
४.सत्त्वापत्ती– साधनेमुळे देहबुद्धी क्षीण झाली की, अतिंद्रिय अनुभव येतात. चित्त स्थिर होते. अनाहत नादाची संवेदना जाणवते. परावाणी जागृत होते. बोलतो तसे होण्याचा अनुभव येतो. या गोष्टीत न अडकता पुढचा प्रवास सुरु ठेवावा. लोकेषणा, वित्तेषणा इ. ईषणांपासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे लागते. टाकळीच्या श्री. कुलकर्णी यांना जीवन प्रदान केल्यानंतर समर्थांनी टाकळी सोडले आणि ते देशाटनाला बाहेर पडले. समर्थांची परावाणी जागृत होती म्हणून वैखरीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांमध्ये सामर्थ्य होते. “जय जय रघुवीर समर्थ” या घोषवाक्याने मोठा लोकजागर केला.
५.असंसक्ती– सर्व आसक्तींचा त्याग आत्मज्ञानाने होतो. समर्थांनी स्वजन, जन, धन, गृह व स्वतःचे नाव याचा त्याग केला, यालाच समर्थ ‘विदेहीपणे मुक्ती भोगित जावी’ असे म्हणतात. योगारुढ झाल्यावरच निर्विकल्प समाधीचा अनुभव घेता येतो. व चिदानंद रुपः शिवोऽहं या भावनेत राहता येते.
६.पदार्थभाविनी- आत्मस्थितीत राहिल्यावर अनात्म पदार्थाविषयी विचारही होत नाही. देहसुख, कर्तेपण भोक्तेपण, मान-अपमान याचा लवलेशही साधकामध्ये राहात नाही. माझा-तुझा, गरीब-श्रीमंत असे सर्व भेद मावळतात. गजानन महाराजांना गांधील माशा चावल्या त्यांनी प्राणपणाने डंख बाहेर काढले व ते शांत राहीले. समर्थांनी थंडी घोंगडीत भरली व शिवाजी राजांशी चर्चा केली. प्रारब्धानुसार त्यांचे व्यवहार होतात.
७.तूर्यगा- जागृती, स्वप्न, सुषुप्ती नंतरची ही अवस्था. यात ध्यानात एकीकडे देहावस्था व दुसरीकडे आत्मानुभव यात साक्षित्वाने साधक राहतो. देह व जगाचे अस्तित्व असून त्याचे त्याला भान नसते. फक्त वृत्तीरुप द्वैत शिल्लक असते. पुढे उन्मनी अवस्थेत मनाचा संपूर्ण लय होतो.
या सात पायऱ्यांमध्ये पहिल्या तीन साधनस्वरुप, चौथी ज्ञानावस्था व शेवटच्या तीन जीवनमुक्त स्वरुप आहेत. सर्व जग ईश्वरमय आहे. स्वतःच्या समर्पणानेच त्याचा प्रसाद मिळतो हे समर्पण ज्ञानाच्या सात भूमिकांमधून कळते.
ज्ञानेविण जे जे कळा। ते ते जाणावी अवकळा॥
ऐसे भगवंत बोलिला। चित्त द्यावे त्याच्या बोला॥
एक ज्ञानाचे सार्थक। सर्व कर्म निरर्थक॥
दास म्हणे ज्ञानेविण। प्राणी जन्मला पाषाण॥
॥जय जय रघुवीर समर्थ॥