दास्यभक्तीचे एकमेव उदाहरण म्हणजे श्रीरामाचा भक्त हनुमंत होय. अलौकिक बुद्धीचे वरदान त्याला लाभले होते. हनुमंताने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले, त्या हनुमंताच्या गोष्टी आपण रामायणकालापासून ऐकत आलो आहोत .पण समर्थांनी आपल्यासमोर जे मारुतीराय उभे केले आहेत ते शक्ती, युक्ती आणि उपासना याचे प्रतीक आहेत ,कारण समर्थांना त्या काळात शक्ती, युक्ती आणि उपासना यांच्याद्वारे समाजाला बलाढ्य करायचे होते. मरगळलेल्या आणि चेतनाहीन बनलेल्या महाराष्ट्राला संघटित करायचे होते .त्यांना बलोपासनेचा संदेश द्यायचा होता.
हनुमंत हे समर्थांचे उपास्यदैवत आणि म्हणूनच त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली .प्रत्येक गावातील युवकांना एकत्र करून भक्तिमार्गाला, उपासनामार्गाला लावले .समाजाला सामर्थ्यशाली बनवायचे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो हे त्यांनी ओळखले आणि भक्तीचे अधिष्ठान समोर ठेवून. अकरा मारुती सातारा जिल्ह्यातील चाफळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात स्थापन केले. या अकरा मारुतीची ११ स्तोत्रे त्यांनी रचली जी सगळ्यांना परिचित नाहीत. सर्वसामान्य घरांमध्ये जे रोज संध्याकाळी म्हणले जाते ते म्हणजे ‘भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती’ पण त्याशिवाय बाकी स्तोत्रांचा सुद्धा अभ्यास व्हावा आणि त्या स्तोत्रात समर्थांना काय म्हणायचे याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे.
समर्थांनी अकरा मारुती कुठे स्थापन केले यासाठी समर्थांची शिष्या वेण्णास्वामी यांनी एक सुंदर अभंग रचला आहे. ज्यामध्ये या अकरा मारुतींचा उल्लेख आहे.
चाफळा माजी दोन, उंब्रजेशी एक ।
पारगावी देख चौथा तो हा ॥
पाचवा मसूरी शहापुरी सहावा |
जाण तो सातवा शिराळ्यात॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा |
दहावा जाणावा माजगांवी॥
ब बह्यात अकरावा, येणे रीती गावा|
सर्व मनोरथा पुरविल॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।
कीर्ती गगनात न समावे॥
समर्थ विवाह मंडपातून पळाले ते विश्वाची चिंता करण्यासाठी टाकळीला आले. तिथे गोदावरीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी उपासना केली या उपासनेचे फळ म्हणजे समर्थांना झालेलं हनुमंताचे दर्शन . समर्थांनी टाकळीला श्रीराम जय राम जय जय राम हा १३ कोटी जप केला ,जप करत असताना एक वानर तिथे येऊन बसत असे , समर्थांच्या रामभक्तिने एक दिवस त्या वानरातील मारुतीने आपले अक्राळ विक्राळ भीमरूप दाखवले .आनंदाने त्याने समर्थांना गळा मिठी मारली. समर्थांच्या शरीराचा कणकण तृप्त झाला. त्यांच्या हृदयातून कृतज्ञतेचा झरा वाहू लागला . हनुमंताच्या ठिकाणी असणारा एकनिष्ठ भाव, भक्ती, प्रेम हे सगळे शब्दबद्ध झाले.
त्यावेळी समर्थांनी उस्फूर्तपणे केलेली हनुमंताची स्तुती म्हणजे हे भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र होय .या स्तोत्रात समर्थांनी हनुमंताच्या गुणांचे वर्णन केले आहे , तो कसा आहे, त्याचे चरित्र काय आहे, तो दिसतो कसा ,त्याच्यातील शक्ती कशी आहे हे सर्व वर्णन करून शेवटच्या चौदाव्या श्लोकापासून त्याची फलश्रुती सांगितली आहे. चाफळला श्रीराम मंदिरात रामाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जो मारुती आहे तो हा प्रताप मारुती, ज्याचं संपूर्ण वर्णन समर्थांनी या स्तोत्रात केले आहे .हे स्तोत्र म्हणताना समर्थांच्या प्रतिभा शक्तीची भव्यता लक्षात येते. समर्थांच्या डोळ्यासमोर दर्शन दिलेला हनुमंत कसा असेल , समर्थ किती मारुतीमय झाले असतील हे समजते.
समर्थांनी रचलेल्या या स्तोत्राने समाजात एक नवचैतन्य निर्माण केले .समर्थांची हनुमंतावरील अपार श्रद्धा त्याची प्रत्यक्ष अनुभूती समर्थांचे प्रसादिक शब्द आणि उत्कट भाव यामुळे समाजाला एक नवी ऊर्जा मिळाली. एक नवे चैतन्य मिळाले .या स्तोत्राचा पहिलाच शब्द भीमरूपी, भीम म्हणजे भयानक संस्कृत मध्ये याचा अर्थ भयानक असला तरी मराठीत आपण तो सौंदर्य युक्त, श्रद्धायुक्त असा वापरतो.एखादी गोष्ट काय भयानक सुंदर आहे! असे आपण म्हणतो, त्या दृष्टीने हे भीमरूप महारुद्रा. रुद्र म्हणजे शंकर ,मारुतीची आई अंजनी ही शापित असल्याने ती वानरीच्या जन्माला आली होती. शंकर तुझ्या पोटी मारुतीच्या रूपाने जन्म घेतील तेव्हा तू शाप मुक्त होशील ,हा तिला उःशाप होता .दशरथाने केलेल्या पुत्र कामेष्टी यज्ञातील प्रसाद घारीने पळवला, तो अंजनीला मिळाला, आणि मारुतीचा जन्म झाला. शंकराचा प्रसाद म्हणून तो महारुद्र ,वायूचा पुत्र म्हणून मारुती, इंद्राने वज्र मारुतीवर फेकले त्याला फक्त हनुवटीला खोच पडली म्हणून हनुमान, वनात राहणारा म्हणून वनारी , अंजनी चा मुलगा म्हणून अंजनी सुता, रामाचा सेवक म्हणून रामदूता , प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा सीतेला शोधायला गेला तेव्हा लंका उध्वस्त केली म्हणून प्रभंजना , केवढी सुंदर आणि अर्थपूर्ण विशेषणे समर्थांनी वापरली आहेत. पहिल्या श्लोकातच समर्थांनी हनुमंताचा जन्म, त्यांना दिसलेलं रूप, त्याला ही विशेषणे का हे सर्व सांगितले . हा हनुमंत कसा आहे तर महाबळी म्हणजे बलवान आहे , सुख देणारा, दुःख हरण करणारा आहे. सगळ्यात महत्त्वाचे तो धूर्त आहे. हनुमंताच्या धूर्तपणाच्या गोष्टी आपण संपूर्ण रामायण बघतो शिवाय निष्ठावान वैष्णव आहे. उत्तम गायक आहे कारण सतत रामरायाचे गुणगान गातो तो दिनांचा नाथ आहे, भव्य सिंदूरलेपन, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सीतेने रामाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून फक्त भांगात सिंदूर लावला, तर हनुमंताने प्रेमाचे प्रतीक म्हणून आपले सर्वांग शेंदूराने माखले म्हणून भव्य सिंदूर लेपना तरी तो सुंदर आहे जगदंतर म्हणजे जगाचे अंतकरण आहे. तो जगन्नाथ म्हणजे जगाचा नायक आहे.
पुण्यवान लोकांना परितोषका म्हणजे आनंद देणारा आहे .हनुमंताचा आवेश बघितला तर काळरुपी अग्नि सुद्धा थरथर कापेल .त्याने आपल्या दंतपंक्ती आवळल्या आहेत .त्याचा राग कसा आहे तर काळाचा सुद्धा थरकाप उडेल. अन्याय बघितला की त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघतात. भुवया ताणून पुच्छ मागे घेतो .हनुमंताचा ब्रह्मांडाला गिळणारा राग बघितला की सगळे घाबरतात. एवढा राग असला तरी आपल्या भक्तासाठी तो उत्तरेकडे झेपावतो. कारण त्याच्या रामरायाची अयोध्या उत्तरेला आहे. त्याचे किरीट कुंडले, कमरेभोवती सोन्याचा कासोटा घातलेला असून तो सडपातळ आहे, चपळ आहे. त्याच्या चपळतेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात महा विद्युल्लतेपरी, तसेच त्याची गती मनाला सुद्धा मागे टाकणारी आहे.
हनुमंताच्या शक्तीच्या व्याप्तीच वर्णन करताना समर्थ म्हणतात की मेरु मंदार पर्वत सुद्धा त्याच्यापुढे लहान वाटतात .अणुपासून ब्रह्मांडापर्यन्त त्याची व्याप्ती आहे. ब्रह्मांडाच्या भोवती सुद्धा वेढा घालू शकेल अशा वज्रासारख्या असणाऱ्या शेपटीमध्ये तर हनुमंताची सगळ्यात जास्त ताकद आहे .आपल्या ताकदीने त्याने संपूर्ण सूर्य मंडळ ग्रासून टाकले आहे. चाफळच्या भीमरूपी स्तोत्रातून प्रकटलेला वीर मारुती शारीरिक आणि मानसिक बलाबरोबर करुणा आणि प्रेम सुद्धा बहाल करतो. या स्तोत्र पठणाने भूत प्रेत संबंध शारीरिक व्याधी या तर नष्ट होतातच ,पण चिंता सुद्धा दूर होतात. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती
ही फलश्रुती म्हणजे आपल्याला अंतर्यामी रामाचे दर्शन होईल ही समर्थांनी दिलेली खात्री आहे. आजही रोज संध्याकाळी हे स्तोत्र प्रत्येक घरात म्हणले जाते .या स्तोत्रातील प्रत्येक शब्द म्हणजे समर्थाचे हनुमंतावरील प्रेम आहे. नियमित पठणाने येणारा अनुभव सुद्धा तेवढाच आनंददायी आहे. हनुमंताप्रमाणे समर्थांची अकरा ही स्तोत्रे चिरंजीव आहेत यात शंका नाही.