तेज किंवा अग्नी– अज या धातूपासून हा शब्द तयार होतो अङ्ग नि ऊर्ध्व म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नी ही इंद्रिय गोचर घटना आहे, दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे व उष्णता व प्रकाश अग्नीमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो, थंड वस्तु मध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते, गॅस वर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो तो वर येतो व वरचा खाली असे पाणी गरम होते. अवकाशातूनही उष्णता मिळते शरीर जीवंत राहण्यासाठी उष्णता लागते त्याला स्वाभाविक शरीराचे तापमान म्हणतो. वैदिक ऋषींनी अग्नीचे महत्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ग्रहपती म्हणतात. अग्नी प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नी आहे तो देह बुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. पोटातील जठराग्नीमुळे अन्नाची चव वाढते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणातल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नी डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पती, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची देवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोध १६.५.२९ मध्ये तीन जिव्हा, चार नेत्र, तीक्ष्ण दाढा, तीन मस्तके, तीन पाद, असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नी ज्ञानी लोकांचा परमेश्वर, गृहस्थाचा पालक, मानवाचा अतिथि, पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे. वास्तु शांतीने अग्नीची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले व श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा चा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम, व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले. होलिकेचे पूजन करून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नी तत्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नी भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्व भक्षकु | त्याची थोरी म्हणोनी सांगावी?
अग्निहोत्र हा मूळ धर्म आहे, ते वेदाचे किंवा सत्यधर्माचे विशुद्धरूप आहे. हा सत्यं प्रात: नित्य चालवायचा यज्ञ आहे व सुलभ अल्पसामुग्रीने, अल्पवेळात, अल्पखर्चात करता येते. दोन चिमटी तांदूळ, 2 थेंब गाईचे तुप, ही आहुती एक व्यक्ती मंत्रोच्चार करून देते. नित्यत्व, सातत्य विशिष्ट वेळ, व नित्य स्मरण यामुळे ही तप:साधना आहे.
वैश्वदेव म्हणजे अग्नीत आहुती देणे, अन्न ग्रहण करण्या अगोदर तुप भाताची आहुती अग्नीला अर्पण करतात. आतिथीची वाट पाहावी. त्याला भोजन द्यावे. गाय, कावळा, कुत्रा यांना द्यावे. जगा व जगू द्या हा संदेश त्यातून मिळतो. अन्न ही ईश्वरी कृपा आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता असे समर्थ म्हणतात.
आपल्या वैदिक संस्कृतीत आर्य अग्नीपूजक होते. त्यांना तेज व अग्नी पासून ज्ञान व प्रेरणा मिळत असे. विटा भाजण्यापासून, अन्न शिजवण्यापर्यंत मानवाचे जीवन अग्नीने व्यापले आहे. उष्णता व शक्तीमुळे अर्थार्जन शक्य होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय अग्नि पासून शक्ती घेतात. त्यांना नियंत्रणात ठेवले तर जीवनात समतोल राहातो. अनियंत्रित ठेवले तर जीवन उध्वस्त होते. मोक्षप्राप्ती संन्यस्त वृत्ती साठी अग्नीउपासना महत्वाची आहे. यात विषय वासना दग्ध होतात. मी व माझे याची निवृत्ती होते. सारी संपदा भगवंताची आहे या भावात कर्म करून ते अग्नीरूप भगवंताला अर्पण करावे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||